Posts Tagged ‘cinema’

Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी)

January 6, 2008

coverimage21.jpgहिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते.
उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य. वातावरणावरून तरी कोणता काळ असावा हे ओळखणं अशक्यच. हजारो, लाखो वर्षापासूनच्या अशा वातावरणात मानवाच्या प्रगतीचं प्रतीक असलेल्या गोष्टींचं जर अतिक्रमण नसेल तर जुना काळ काय आणि आधुनिक काळ काय, सारखाच. अशा या जागी डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या शेजारी एक दुर्गम गुहा होती. गुहेभोवतीचे उंच हिरवेगार सळसळते गवत हवेच्या झुळकेसोबत मधून मधून डोलत होते. त्या प्राचीन गुहेत एक ऋषी ध्यानमग्न बसलेला होता. डोक्यावर जटांचे बुचडे बांधलेले. दाढी मिशा वाढून वाढून थकलेल्या. कितीतरी वर्षाच्या साधनेने, एक तेज , एक गांभीर्य ऋषीच्या चेहऱ्यावर आलेलं होतं. आजूबाजूच्या परिसरापासून अनभिज्ञ. नव्हे काळ, जागा आणि शरीरापासून अनभिज्ञ त्याचे विचरण कालत्रयी युगे युगे चाललेले असावे. अनादि अनंत सनातन काळातून विचरण करता करता या आधुनिक काळात त्या ऋषीच्या सूक्ष्म जाणीवेने प्रवेश केला …

अमेरिकेतील एका शहरातील रस्त्याच्या फुटपाथवर संध्याकाळच्या वेळी लोक आपल्या आधुनिकतेच्या रूबाबात चालत होते. रस्त्यावरून वाहने धावत होती. लोक आपापल्यातच एवढे अंतर्मुख होते की एकमेकांकडे लक्ष द्यायलासुध्दा त्यांना वेळ नव्हता. सगळं कसं सुरळीत , पूर्वनियोजित असल्यासारखं एखाद्या स्वयंचलित यंत्रागत. सर्वांची नजर कशी नाकाच्या दिशेने सरळ. कदाचित ते लोक इकडे तिकडे बघणंं म्हणजे बावळटपणा किंवा शिष्टाचाराच्या विरुध्द मानत असावेत. अशा या लोकांच्या समूहातील एक सुंदर स्त्री अँजीनी आपल्या हातात शॉपिंगची बॅग घेऊन एका दुकानात जायला निघाली होती. अँजेनी एक बावीस तेवीस वर्षाची लाघवी , रेखीव चेहऱ्याची, सदा हसतमुख अशी तरुणी होती. एका हाताने आपल्या कपाळावर येणाऱ्या केसांच्या बटा सावरत आणि दुसऱ्या हातात शॉपिंगची बॅग सांभाळत ती दुकानात जात होती. तिच्या काठोकाठ भरलेल्या शॉपिंग बॅगवरून तरी असे जाणवत होते की तिची जवळपास खरेदी पूर्ण झाली असावी, फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या असाव्यात. अचानक एक पोलीस व्हॅन सायरन वाजवीत रस्त्यावरून धावायला लागली. लोकांचा सुरळीतपणा जसा भंग झाला. अँजेनी दरवाजातच थांबून काय झालं ते बघायला लागली. कुणी चालता चालता थांबून, कुणी चालता चालता वळून काय झालं ते बघायला लागले. जणू कितीतरी दिवसानंतर त्यांच्या भावशून्य यांत्रिक मख्ख चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटायला लागले. काही जण तर तसेच भावशून्य मख्ख चेहऱ्यांनी काय झालं ते बघायला लागले चेहऱ्यांवर कोणतेही भाव दाखवणं कदाचित त्यांच्या शिष्टाचारात बसत नसावं. पोलीस व्हॅन आली तशी भरधाव वेगाने निघून गेली. रस्ता थोडा वेळ पाण्यात दगड पडून तरंग उठावेत तसा विचलित झाल्यासारखा झाला. आणि पुन्हा पूर्ववत, स्वयंचलित यंत्रागत, जसे काही झालेच नाही असा झाला. अँजेनी दरवाजातून वळून दुकानात गेली. तिला काय माहित होते की आता रस्त्यावरून गेलेल्या पोलीस व्हॅनचा तिच्या जीवनाशी पण काहीतरी संबंध असावा.

पोलीस व्हॅन एका गजबजलेल्या वस्तीत एका अपार्टमेंटच्या खाली थांबली. वस्तीत एक अनैसर्गिक शांतता पसरली. गाडीतून घाईघाईने पोलीस ऑफिसर जॉन आणि त्याची टीम उतरली. काही जण अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसलेले होते ते वाकून खाली पोलीस व्हॅनकडे बघायला लागले. उतरल्याबरोबर जॉन आणि त्याच्या टीमने अपार्टमेंटच्या लिफ्टकडे धाव घेतली. ड्रायव्हरने गाडी आत नेवून पार्किंगमध्ये पार्क केली. जॉन आणि त्याचे सहकारी लिफ्टजवळ आले. लिफ्ट जागेवर नव्हती. जॉनने लिफ्टचे बटन दाबले. बराच वेळ वाट पाहूनही लिफ्ट यायला तयार नव्हती.
” शिट” चिडून जॉनच्या तोंडून निघाले.
जॉन अस्वस्थतेने लिफ्टचे बटन पुन्हा पुन्हा दाबायला लागला. थोड्या वेळाने लिफ्ट खाली आली. जॉनने लिफ्टचे बटन पुन्हा एकदा दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला. आत एकच माणूस होता, काळं टी शर्ट घातलेला. त्याही परिस्थितीत त्याच्या टी शर्टवर लिहिलेल्या अक्षराने जॉनचे लक्ष आकर्षित केले. त्याच्या काळ्या टी शर्टवर पांढऱ्या अक्षराने लिहिलेले होते
‘ झीरो’.
तो माणूस बाहेर येताच जॉन आणि त्याचे साथीदार लिफ्टमध्ये घुसले. जॉनने 10 नं. च्या फ्लोअर चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

10 नं. फ्लोअरला लिफ्ट थांबली. जॉनसहित सगळे जण भराभर बाहेर आले. त्यांनी बघितले तो समोरच एक फ्लॅट सताड उघडा होता. ते सगळे जण उघड्या फ्लॅटच्या दिशेने धावले. ते एकमेकांना कव्हर करीत हळू हळू फ्लॅटमध्ये जायला लागले. हॉलमध्ये कुणीच नव्हते. जॉन आणि अजून दोन जण बेडरूमकडे वळले. बाकीचे कुणी किचन , स्टडी रूम आणि बाकीच्या रूम्स बघू लागले. किचन आणि स्टडी रूम रिकामीच होती. जॉनला बेडरूमध्ये जातांनाच बेडरूममधले सामान अस्ताव्यस्त झालेले दिसले. त्याने आपल्या साथीदारांपैकी दोघांना खुणावले. जॉन आणि त्याचे दोन साथीदार हळू हळू बेडरूममध्ये जाऊ लागले. ते एकमेकांना कव्हर करीत आत घुसताच, समोर एक विदारक दृष्य त्यांच्यापुढे वाढून ठेवलेले त्यांना दिसले. एक रक्तबंबाळ माणूस बेडवर पडलेला होता. त्याचे शरीर निश्चल होते, एकतर त्याचा जीव गेलेला असावा किंवा तो बेशुध्द झालेला असावा. जॉनने समोर जाऊन त्याची नाडी बघितली. त्याचे प्राणपाखरू केव्हाच उडून गेलेले होते.
” इकडे आहे … इकडे”
जॉनच्या सोबत असलेला एक साथीदार ओरडला.
आता जॉनच्या मागे त्याचे बाकीचे साथीदारसुध्दा आत आले. जॉनने आजूबाजूला न्याहाळून बघितले. अचानक त्याचे लक्ष ज्या भिंतीला बेड लागून होता त्या भिंतीने आकर्षित केले. भिंतीवर रक्त उडाले होते किंवा रक्ताने काहीतरी लिहिलेले होते. जॉनने लक्ष देऊन बघितले. ते लिहिलेलेच असावे कारण भिंतीवर रक्ताने एक गोल काढण्यात आला होता.
गोलचा अर्थ काय असावा?
जॉनचे विचारचक्र फिरायला लागले. आणि ते रक्त या शवाचेच आहे की अजून कुणाचे? ते खुन्याने काढलेले असावे की मग जो मेला त्याने मरायच्या आधी काढले असावे?
” यू पिपल कॅरी ऑन” जॉनने त्याच्या साथीदारांना त्यांची इन्वेस्टीगेशन प्रोसीजर सुरू करण्यास सांगितले.
त्याचे साथीदार आपापल्या ठरवून दिलेल्या कामात गुंतून गेले. जॉनने बेडरूममध्ये एकदा पुन्हा आपली नजर सगळ्या गोष्टींकडे बारकाईने न्याहाळत फिरविली. बेडरूममध्ये कोपऱ्यात एक टेबल ठेवले होते. टेबलवर एक फोटो होता. फोटोच्या बाजूला काही पाकिटे पडलेली होती. जॉनने एक पाकिट उचलले. त्यावर लिहिलेले होते
‘प्रति – सानी कार्टर’.
कदाचित मृतकाचं नाव सानी कार्टर होतं आणि ही पाकिटं त्याला डाकेतून आली होती. जॉनने बाकीची पाकिटं उचलून बघितली. पाकिटं चाळीत जॉन खिडकीजवळ गेला. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर नयनरम्य तलावाचं दृष्य होतं. फ्लॅटला बाहेर किती सुंदर व्ह्यू होता. काही क्षणांकरीता का होईना जॉन स्वत:ला आणि सभोवतालच्या परिस्थितीला विसरून गेला. गोल तलावाला वेढणारी हिरवीगार हिरवळ पाहून जॉनचं मन जणू अंतर्मुख झालं होतं. तलावाकडे पाहता पाहता तलावाच्या आकाराने त्याचे विचार त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जोडले गेले. तलावाचा आकार जवळपास गोलाकारच होता. जॉनची विचारचक्रे पुन्हा धावू लागली…
‘…. भिंतीवर गोलाकार काय काढले असावे?’
अचानक जॉनच्या डोक्यात विचार चमकला.
‘गोल म्हणजे ‘झीरो’ तर नसावा…. हो नक्कीच गोल म्हणजे झीरोच असावा.’
त्याने आवाज दिला ” सॅम आणि तू डॅन ”
” यस सर” सॅम आणि डॅन समोर येत म्हणाले.
“आपण लिफ्टमध्ये चढतांना आपल्याला एक काळ्या टी शर्टवाला माणूस दिसला होता… आणि त्याच्या टी शर्टवर ‘झीरो’ असं लिहिलेलं होतं …लक्ष होतं ना तुमचं ?” जॉनने त्यांना विचारलं.
” हो सर, माझ्या लक्षात आहे त्याचा चेहरा” सॅम म्हणाला.
” हो सर, माझ्या पण लक्षात आहे” डॅन म्हणाला.
” गुड… लवकरात लवकर खाली जा आणि बघा तो खाली सापडतो का ते?… जा लवकर तो अजूनही जास्त दूर गेलेला नसावा.”
जॉनचे साथीदार सॅम आणि डॅन जवळजवळ धावतच निघाले.
….(क्रमशः)

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com